संतप्त जमावाने मृतदेह नेला पालिकेत
अस्वच्छता आणि डासांची उत्पत्ती वाढल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असतानाही महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी डेंग्यूसदृश्य आजाराने एका बालकाचा मृत्यू झाला. या आजाराने मृत्यू झालेला हा आठवा रुग्ण होय. बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी सायंकाळी बालकाचा मृतदेह थेट महापालिकेत नेल्याने खळबळ उडाली. दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिल्यानंतरच संतप्त नातेवाईक अंत्यविधीसाठी अमरधामकडे वळले. शहर आणि परिसरात अस्वच्छता वाढल्याने आजारही फैलावले आहेत. बुधवारी दुपारी डेंग्यूसदृश्य आजाराने उमेर एकबाल पिंजारी (११ महिने) या बालकाचा मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. संतप्त नातेवाईकांनी कबीरगंज भागातून उमेरचा मृतदेह थेट महापालिकेत आणला. आयुक्त सोनवणे यांनी उमेरच्या नातेवाईकांची भेट घेवून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांचा राग शांत झाला. या घटनेनंतर लगोलग शहरात स्वच्छता राबविण्याची मोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue couse 8 death