मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.
ओबीसींच्या ताटातलं काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही-फडणवीस
मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्रं देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींकरता योजना करणारे हे सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. मराठावाड्यात १९४८ पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते. मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आता ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असे आपण सागितले आहे.”
उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते-फडणवीस
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “ओबीसींना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणणार नाही त्यावर त्याचा विकास होणार नाही. ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही. कोणीही मनात शंका घेऊ नका.” देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोशी समाज अग्रेसर होता. ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला. त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले. रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते. उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते, स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत.
फितुरी झाली नसती तर…
उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली. शंभूराजे पण असेच पकडले गेले. राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली. पण समाजाची लढाई थांबली नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले. यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहिती होते. पण इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही. जवळपास ८० वर्षे गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला. आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचा विकास शौर्य आठवण करून द्यायचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.