बहुचर्चित हायड्रो वीड ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी नवीन चिचकार याला ११ जून रोजी मलेशियातून अटक करण्यात आली असून, त्याला भारतात परत आणण्यात आलं आहे. आरोपी नवीन चिचकार मलेशियामध्ये लपून बसलेला आहे. ही माहिती खात्रीलायक असल्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्याला तिथे अटक केली आणि भारतात निर्वासित म्हणून पाठवले. चिचकरचा भागीदार प्रभात पांडेला देखील अटक झाली आहे. या प्रकरणाची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
नवीन चिचकर नावाचा एक व्यक्ती आहे. हा हायड्रो गांजाचं काम करत होता. देशातून तो पळून गेला आणि ऑस्ट्रेलियात त्याने एक बेट विकत घेतलं आणि तो थायलंड आणि युएसमधून हायड्रो गांजा आपल्या देशात पाठवत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे लक्षात आलं की हायड्रो गांजा पोस्टाने पाठवलं. पोस्टाचे लोक सापडले, कस्टमचे लोक सापडले यांना अटक करण्यात आली आहे. तसंच आपले दोन पोलीस सामील आहेत हे समजल्यावर त्यांनाही बडतर्फ केलं. तसंच इतकं सगळं समजल्यावर तिथे जाऊन नवीन चिचकरला आपल्या पोलिसांनी पकडून आणलं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
अंमली पदार्थांच्या बाबतीतलं मुंबई पोलिसांचं धोरण झीरो टॉलरन्सचंच-फडणवीस
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “या संदर्भातली पोलिसांचं धोरण हे झीरो टॉलरन्सचंच आहे. दोन इंडोनेशियन नागरिकांना पाच दिवसांपूर्वी पकडण्यात आलं. त्यांच्याकडून २१ किलो हायड्रो गांजा, २१ कोटी ५५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. हे लोक तुरुंगात जातात, चार महिन्यांनी सुटून आल्यावर पुन्हा हाच व्यवसाय करतात हे लक्षात आलं आहे. त्यामुळे या संदर्भातला जो कायदा आहे त्यात आपण सुधारणा या अधिवेशनात करणार आहोत. अशा प्रकारचा गुन्हा जो आहे त्या अंतर्गत मकोकाच्या अंतर्गत अटक करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांपाशी ज्या पान टपऱ्या किंवा ठेले होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो तिथे धाड टाकण्यात आली असं नाही तर त्यांचं अतिक्रमणही काढलं आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पूर्वी पेडलर पकडले जायचे, तो पेडलर आत जायचा आणि बाहेर यायचा आता मागे नेमके कोण आहेत? ते शोधून आपण कारवाई करत आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.