सोलापूर : अक्कलकोटमध्ये श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थाच्या १४४ व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांची मांदियाळी होती. करोना महामारीमुळे दोन वर्षे खंडित झालेल्या स्वामींचा पुण्यतिथी उत्सव सोहळय़ात चैतन्य निर्माण झाले होते. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. पहाटे पारंपरिक पद्धतीने काकडआरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुले झाले. नंतर नगरप्रदक्षिणा झाली. देवस्थान आणि अक्कलकोट संस्थानच्या राजघराण्याच्या वतीने महेश इंगळे व गणेश दिवाणजी यांच्या उपस्थितीत पारंपरिक लघुरुद्र पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडले. सकाळी ११ वाजता देवस्थानची नैवेद्य आरती आणि दुपारी १२ वाजता अक्कलकोट संस्थान राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते जयप्रभादेवी राजेभोसले, श्रीराम कदम, ययाती साटम व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.
या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आदींनी हजेरी लावली होती. दुपारनंतर देवस्थानच्या भक्त निवास भोजन कक्षात भाविकांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. दिवसभर उकाडा असह्य होत असताना रणरणत्या उन्हात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून देवस्थान समितीने सभोवताली कापडी छत उभारले होते. दर्शन शिस्तीने आणि सुलभतेने होण्यासाठी लाकडी संरक्षक कुंपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
तत्पूर्वी, श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळय़ासह सांस्कृतिक धर्मसंकीर्तन सोहळय़ाची समाप्ती झाली. भजन सेवेत सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला इत्यादी भागातून ४२ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली. देवस्थान समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वला सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, अॅड. प्रदीप झपके, विजय दास, शशिकांत लिम्बीतोटे आदींनी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळय़ाचे नेटके नियोजन केले होते.