जालना : अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने बुधवारी जालना जिल्ह्यात २० मार्गावर रास्तोरोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यातील सोळा ठिकाणी रस्तारोको केल्याची नोंद असून, काही ठिकाणी रस्त्यावर मेंढ्या बसवून हे आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बो-हाडे यांनी जालना येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा बुधवारी सोळावा दिवस होता. अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बाजार समितीसमोर रस्तारोको करण्यात आला. त्याचप्रमाणे याच राष्ट्रीय महामार्गावर जामखेड गावाजवळही आणि घनसावंगी या तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावर मेंढ्या बसवून आंदोलन करण्यात आले.
अंबड तालुक्यातील शहागड, शिरनेर फाटा, जालना-अंबड रस्त्यावरील शेवगा फाटा, किनगाव चौफुली, अंबड, जालना-अंबड रस्त्यावरील काजळा फाटा, भोकरदन तालुक्यातील धावडा, राजूर, हसनाबाद, जाफराबाद-भोकरदन रस्त्यावरील बोरगाव जहागीर, जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील बदनापूर, जालना- मंठा रस्त्यावरील वाटूर फाटा, आष्टी, रामनगर इत्यादी ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.
उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबई येथे गेले होते. परंतु दोन दिवस चर्चा करूनही कांही मार्ग निघाला नाही. या अनुषंगाने बोऱ्हाडे यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी फडणवीस यांच्याकडून सत्तेवर आल्यास धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु सत्तेवर येऊनही आमची अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी पूर्ण केली जात नाही. दोन दिवस शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यावरही कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. धनगड आणि धनगर एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यात आला पाहिजे. त्याशिवाय यापुढे चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही बोऱ्हाडे म्हणाले.