छत्रपती संभाजीनगर – धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील एका पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
दाळिंब येथून जवळ असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील रहिवासी ही मुले आहेत. सुशांत बाळू चव्हाण (वय ६) व प्रमोद बालसिंग चव्हाण (वय ७) अशी मृत्यू पावलेल्या मुलांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे.
ही मुले गाव परिसरातील पाझर तलावातील पाण्यात उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. मुले बराच वेळ दिसत नसल्याचे शेतकामावरून घरी परतलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. पाण्याकडे गेले आहेत का ? म्हणून पाहण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना सायंकाळच्या सुमारास बुडालेले मृतदेह तलावात तरंगताना दिसून आले. त्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेनंतर शिवाजीनगर तांडा परिसरावर शोककळा पसरली. नजीकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.