कोल्हापूर : मान्सून कालावधीत इचलकरंजी, हातकणंगले भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
वारणा व पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, किणी, रांगोळी, इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित १५ भागांबाबत तालुका प्रशासनाने व इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतला. तत्पूर्वी हातकणंगले तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव येथील ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांसाठीच्या संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली.
उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरकुमार साळवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सुनील शेरखाने, रोहित तोंदले, प्रसाद संकपाळ उपस्थित होते. रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा, अशा सूचना येडगे यांनी यावेळी दिल्या.उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय व गावनिहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती दिली.