जळगाव : येथील नामवंत वैद्य श्रीरंग छापेकर यांच्या आयुर्वेदातील संशोधित उत्पादनांना तीन बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट) मिळाले असून यात दोन भारत सरकारचे उत्पादन निर्मितीबद्दल, तर एक ऑस्ट्रेलिया सरकारचा नावीन्यपूर्ण संशोधनात्मक निर्मितीचा बौद्धिक संपदा अधिकार आहे. एकाच वेळी तीन बौद्धिक संपदा अधिकार मिळविणारे वैद्य श्रीरंग छापेकर हे खान्देशातील पहिलेच वैद्य ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील वैद्य छापेकर यांच्या संशोधनाची भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारनेही दखल घेतली आहे. ३६० अंश अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या माध्यमातून आयुर्वेद औषधींची सुरक्षितता आणि परिणामकारकता तीनपट वाढणार आहे. लाल तांदूळ, हिरव्या मुगाच्या रेडी टू सव्‍‌र्ह बनविलेल्या सारसाठीही त्यांना बौद्धिक संपदा अधिकार मिळाला आहे. वैद्य छापेकर हे सतत नवनवीन संशोधन करून आयुर्वेद उपचारासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारला अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्टंट चेंबरचे नावीन्यपूर्ण संशोधन सादर केले होते.

लाल तांदूळ आणि हिरवे मूग यांपासून सार तयार करण्याचे तंत्र छापेकर यांनी पाठविले होते. त्यास दोन्ही सरकारकडून मान्यता मिळाली असून, त्यांचे बौद्धिक संपदा अधिकार मान्य झाले आहेत. त्याबाबतची मान्यता मिळाल्याचे गेल्या महिन्यात भारत, ऑस्ट्रेलिया सरकारकडून त्यांना कळविण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारचा बौद्धिक संपदा अधिकार अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्टंट चेंबरच्या नावीन्यपूर्ण संशोधनात्मक निर्मितीबद्दल मिळाला आहे. आयुर्वेदात औषधींसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, पावडर, चूर्ण यामध्ये बुरशी व जंतुसंसर्ग होऊ नये, त्या दीर्घकाळ सुरक्षित राहाव्यात आणि त्यांची परिणामकारकता वाढावी यासाठी हे अल्ट्राव्हायोलेट चेंबर बनविण्यात आले आहे. या चेंबरमध्ये ३६० अंशांतून अल्ट्राव्हायोलेट किरणे पडत असल्याने त्यांचा केवळ पृष्ठभागाशी संबंध न येता त्या चेंबरमध्ये ठेवलेल्या सर्व पदार्थावर परिणाम होतो. लाल तांदूळ आणि हिरवे मूग यांचा सार यांना आयुर्वेदात पेय, यूष असे म्हटले जाते. या दोन्हींपासून रेडी टू सव्‍‌र्ह बनविलेल्या या दोन्ही सारास बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट) मिळाला आहे. यात आयुर्वेदशास्त्रानुसार पाचक घटकांचे मिश्रण आहे. आजारातून बरे झालेल्या रुग्णांना हलका व पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. गर्भिणी व प्रसूत माता, तसेच सहा महिन्यांवरील बालकांसाठीही पौष्टिक आहाराची गरज असते. पंचकर्मात आणि पंचकर्मानंतरदेखील हे सार वापरता येते. सर्वसामान्य नागरिकही हे पेय आणि यूष सार घेऊ शकतात. हिरव्या मुगाचे सार आणि लाल तांदळाचे सार या दोन्ही उत्पादनांना भारत सरकारने बौद्धिक संपदा अधिकार देत मान्यता दिली आहे. एकाच वेळी तीन बौद्धिक संपदा अधिकार मिळवीत वैद्य छापेकर यांनी एक विक्रम केला आहे. खान्देशात प्रथमच असे बौद्धिक संपदा अधिकार मिळाल्याबद्दल वैद्य छापेकर यांचा वैद्यकीय क्षेत्रातून गौरव करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor shrirang chaphekar get three patent rights for ayurvedic products zws