सांगली : ‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी सिनेमातील कथानकाप्रमाणे प्राप्तीकर अधिकारी असल्याची बतावणी करत रोकडसह कोट्यवधीची लूट करण्याचा प्रकार कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरांच्या घरी रविवारी रात्री घडला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चार संशयितांमध्ये एका महिलेचा सहभाग होता. ‘स्पेशल २६’ चित्रपटातील कथेसारखा हा प्रकार सांगलीतील कवठेमहांकाळ शहरात रविवारी रात्री घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,

कवठेमहांकाळ मध्ये डॉ. जी. डी. म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काल रात्री तीन पुरुष व एका महिलेने प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकला. यावेळी चौघांनी ओळखपत्र दाखवत झडती घेण्याबाबत सर्च वॉरंट असल्याचे दाखवले. त्यानंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली. यावेळी घरातील १६ लाखाची रोख रक्कम आणि एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने सोने असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला.

संशयितांनी पलायन केल्यानंतर डॉ. म्हेत्रे यांनी या छाप्याबाबत चौकशी केली. त्यावेळी हा छापा बनावट असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झाला आहे. या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटे कोणत्या मार्गावर गेले याचा शोध देखील आता घेतला जात आहे. ‘स्पेशल छब्बीस’ या चित्रपटातील कथेसारख्या या प्रकाराने कवठेमहांकाळसह सांगली जिल्हामध्ये  खळबळ उडाली आहे.