अमेरिकेतील प्रतिष्ठित जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅलुम्नस’ हा पुरस्कार २०१६ या वर्षांसाठी डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांना देण्यात येणार आहे. आपल्या कार्यातून विद्यापीठाची परंपरा जोपासणाऱ्या व आपल्या ज्ञानाचा वापर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वीही २०१३ साली याच विद्यापीठाच्या सोसायटी ऑफ स्कॉलर्स या सर्वोच्च पुरस्कारासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा पहिला अ‍ॅलुम्नस पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर आरोग्या समस्या सोडविण्यासाठी सहा वष्रे ग्रामीण भागात जाऊन काम केले. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशिप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले. येथे त्यांना डॉ.डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन दिग्गज गुरू म्हणून लाभले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गडचिरोलीतील स्त्रिया व आदिवासींचे आरोग्य, दारू व तंबाखूचे व्यसन, तसेच बालमृत्यू हे प्रश्न सोडविण्यासाठी केला. बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते, हे विशेष.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rani and dr abhay bang get johns hopkins university award