राज्यात काही भागांत बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने तसेच वीज अंगावर पडून एकूण आठजण मृत्युमुखी पडले आहेत.
वादळी वारे व विजांच्या कडकडाटात सोलापूर येथे गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. त्या मध्ये नवीन तुळजापूर नाका येथे कॅन्टीनवर वादळी वाऱ्याने पत्रे अंगावर पडून इसाक मैनुद्दिन शेख (वय ३०) व सुरेश शिवराम भोसले (वय ४०, मड्डीवस्ती, भवानी पेठ) यांचा मृत्यू झाला. तसेच मोहोळ तालुक्यातील कामती येथे रात्री पाऊस पडताना वीज कोसळून दोन जण ठार झाले. त्यांची नावे समजू शकली नाहीत. मंगळवेढा येथेही वादळीवाऱ्याने एकाचा बळी गेला.
वाईच्या पश्चिम भागातही गारांचा मोठा पाऊस झाला.  या वेळी विजाचाही मोठा कडकडाट होता. शेतामधल्या काम करणाऱ्यांचीही धांदल उडाली. यातच वासोळे (ता. वाई) येथे धुळा नावाच्या शिवारात शेतात सातआठ महिला काम करत होत्या. जोरदार पाऊस आला म्हणून त्या शेतातीलच आडोशासाठी उभ्या होत्या. या वेळी वीज पडून द्रौपदा चंद्रकांत तुपे (४०) या जागीच मृत झाल्या तर अर्चना दगडू तुपे (२७) व चंद्रभागा राजाराम तुपे (४०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर वाईतील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्य़ात बुधवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. औसा तालुक्याच्या काही भागात सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसादरम्यान माळकोंडजी येथील शेतकरी व्यंकट विभुते (वय ६२) सुरक्षित स्थळी जात असताना अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाले. तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यु झाला असून त्याचा तपशील मात्र समजलेला नाही.
गारांची वृष्टी
महाबळेश्वर भिलार, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. अर्धा ते पाऊण तासात विजांच्या कडकडाटात आणि गारांच्या वर्षांत जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरच्या परिसरात तर रस्त्यावर गारांचा थर जमा झाला होता. तापोळा रस्त्यावर अध्र्या फुटाचा गारांचा थर जमा झाला होता. अचानक आलेल्या पावसाने आणि गारांचा थर पाहून पर्यटक सुखावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मान्सूनचा अंदाज आज
राज्यात दुष्काळी स्थिती असताना यंदाचा मान्सूनचा पाऊस कसा असेल याबाबतचा भारतीय हवामान विभागाचा (आयएमडी) अधिकृत अंदाज शुक्रवारी (२६ एप्रिल) नवी दिल्ली येथे जाहीर केला जाणार आहे. दक्षिण आशियाच्या हवामानतज्ज्ञांच्या बैठकीत (सॅसकॉफ) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज गेल्याच आठवडय़ात देण्यात आला. या पाश्र्वभूमीवर आयएमडीचा अंदाजही दिलासा देणारा असणार का, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight killed by untimely rain