कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळील कोयना नदीवर जुन्या पुलाचे सक्षमीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या सक्षमीकरणासाठी ठेकेदार डी. पी. जैन कंपनीने जगातील सर्वांत अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या जपानच्या अभियंत्यांना प्राचारण केले आहे. त्यामुळे आता जपानी तंत्रज्ञानाने या जुन्या कोयना पुलाचे सक्षमीकरण होऊन पुलाची सक्षमता पन्नास वर्षांपर्यंत वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महामार्गावरील शेंद्रे ते कागल दरम्यान, सहापदरीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. कराडजवळील कोयना नदीवर दोन पूल आहेत. नवीन पुलाचे काम करताना ठेकेदार डी. पी. जैन कंपनीच्या अभियंत्यांनी जुन्या कोयना पुलाची पाहणी केली होती. त्या वेळी या पुलाला काही ठिकाणी छिद्रे पडल्याचे आढळले. त्यामुळे या पुलाचेही मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी डी. पी. जैन कंपनीने भारतासह जगातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या अभियंत्यांना बोलावले. त्यात जपानमध्ये असे पुलाचे काम करण्याचे सर्वांत आधुनिक तंत्रज्ञान असल्याने कंपनीने जपानच्या अभियंत्यांना जुन्या कोयना पुलाचे काम करण्यासाठी बोलावले. त्यामध्ये चार अभियंत्यांचा समावेश आहे.

 ज्या ठिकाणी पुलाला छिद्रे पडली आहेत, त्या ठिकाणी सर्वांत मजबूत ग्राउंड भरले जाणार आहे, तसेच पुलाचे एकूण पाच ते सहा भाग असून, पुलाच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या एक्स्पान्शन जोडचे काम करणाऱ्या भारतातही अनेक कंपन्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे अजून अद्ययावत तंत्रज्ञान आलेले नाही. शिवाय त्यांनी हे काम केले, तर कमीत कमी महिनाभराचा कालावधी लागून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला असता. त्यामुळे डी. पी. जैन कंपनीने अत्याधुनिक पद्धतीने हे काम करणाऱ्या जपानच्या अभियंत्यांना पाचारण केल्याने हे काम केवळ पाच दिवसांत पूर्ण होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Empowerment of karad old koyna bridge with japanese technology amy