पालघर : देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त १८ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, कार्यक्रम आयत्या वेळी रद्द केल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी ‘तारापूर अ‍ॅटोमिक पॉवर प्रोजेक्ट’च्या (टॅप्स) नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.

सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त १८ डिसेंबर रोजी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ व २ च्या प्रांगणामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमासाठी माजी कर्मचाऱ्यांना आधीच निमंत्रणे पाठविण्यात आली होती. परंतु, कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी झाल्याने काही जणांपर्यंत वेळेत ही माहिती पोहोचली नाही. त्यामुळे पंजाब, बंगळूरु, केरळ, कोची, पुणे येथून सुमारे ५० माजी कर्मचारी कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे कळताच त्यांनी ‘टॅप्स’च्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.

या प्रकाराला व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अरेरावी कारणीभूत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाबाबत ‘टॅप्स’ व्यवस्थापनाने निरुत्साह दाखविल्याने पेन्शनर्स असोसिएशनने परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.

झाले काय? : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सलग पन्नास वर्षे वीज उत्पादन करीत असताना या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाची न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एन.पी.सी.आय.एल.) तसेच ‘टॅप्स’ने दखल घ्यावी व गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात या केंद्राने केलेल्या नफ्याची एक टक्का रक्कम येथे कार्यरत असलेल्या ५७० कामगारांमध्ये वितरित करावी अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी सोमवारी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ व २ च्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन सुरू केल्यानंतर व्यवस्थापन जागे झाले. युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. सुवर्ण वर्षांनिमित्ताने कामगारांनी मागितलेला विशेष मोबदला (मोमेंटो)बाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कार्यक्रम न करण्याचे आश्वासन टॅप्स व्यवस्थापनाने दिल्याने, हे आंदोलन स्थगित करण्यात आले.