रायगड जिल्ह्य़ातील मुरुड तालुका सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. महाळुंगे गावाजवळ अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.  जखमी मुलींवर अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हा गोळीबार ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने केला गेला असल्याचा आरोप केला जात आहे. सोमवारी सायंकाळी महाळुंगे गावातील पाच ते सहा मुली गावातील शाळेजवळ फिरायला गेल्या होत्या. या वेळी त्यांच्यावर जंगलातून गोळीबार करण्यात आला. यात पूजा विलास पालवणकर व सायली रातवडकर या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील हे या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा गोळीबार ठासणीच्या बंदुकीतून झाला असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाळुंगे खुर्द येथे चार दिवसांपूर्वी गावाबाहेरील घरामध्ये एकटीच असलेल्या ६० वर्षीय महिलेस हातपाय बांधून व तोंडात बोळा कोंबून अंदाजे दीड लाख रुपयांच्या जबरी चोरीचा प्रकार घडला होता. तसेच या महिन्यात नजीकच्या मांडला व सुरई येथील गावातील बंद घरात घरफोडी झाली होती.
या घटनांनंतर महाळुंगे येथील सोमवारच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.