सांगली : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिकेच्या पाच अभियंत्यांवर दंडात्मक, तर एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या कडून करण्यात आली, तसेच महापालिकेचे मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पारदर्शक व गतिमान प्रशासन होण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. तसेच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आयुक्त गांधी यांनी गेल्या आठवड्यात केल्या आहेत. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून कर्तव्य अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे दिसून आले नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

घनकचरा व्यवस्थापनाबाबत अपेक्षित काम होत नसल्याचे दिसून आल्यानंतर आरोग्य अधिकारी पदावरून डॉ. रवींद्र ताटे यांच्याकडे प्रभारी उद्यान अधीक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉ. ताटे यांच्यावर तीन महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे सार्वजनिक बगिच्यांची देखभाल व रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या बाजूला करण्याची जबाबदारी होती. मात्र त्यांच्या कडून कामात हलगर्जीपणा दिसून आला. यामुळे त्यांच्यावर तीन महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दैनंदिन पाहणी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना नगररचना विभागातील अभियंत्यांना देण्यात आली आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी शाखा अभियंत्याकडून होत नसल्याचे दिसून आले. यामुळे कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या पाच कनिष्ठ अभियंत्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यामधील कोरेवगळता अन्य चार अभियंते मानधन तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत आहेत. तसेच प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस आयुक्त गांधी यांनी बजावली आहे. आयुक्तांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.