वणी-नांदुरी मार्गावर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव मोटार झाडास धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच ठार तर तीन युवक गंभीर जखमी झाले. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना हा अपघात झाला. मृत व जखमी हे सर्व वणी येथील रहिवासी आहेत.
वणी-नांदुरी-कळवण महामार्गावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला. वणीतील काही युवक मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नांदुरी येथे गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते मोटारीतून माघारी निघाले. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्यालगतच्या झाडाला जाऊन धडकली व नंतर उलटली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात साहील जावरे (२०), सईद सय्यद (१७), सचिन शेळके (२५), सकलेन सय्यद (१९), सचिन ढोले (३०) या युवकांचा जागीच मृत्यू झाला. इम्रान शेख, ज्ञानेश्वर धूम व रोशन खाडम हे जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. गाडीची अवस्था इतकी भीषण होती की, अपघातग्रस्तांना बाहेर काढताना सर्वाची दमछाक झाली. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वणी गावात शोककळा पसरली. शनिवारी दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2015 रोजी प्रकाशित
नाशिक जिल्ह्यत अपघातात पाच युवक ठार
वणी-नांदुरी-कळवण महामार्गावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला.
Written by मंदार गुरव
First published on: 20-12-2015 at 02:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five teenagers were killed in nashik accident