अहमदनगरमधील कोपर्डीत येथे १५ फुट खोल बोअरवेलमध्ये पडल्याने एक पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सुरू होते. मात्र, या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे शांत का?”, संजय राऊतांचा सवाल; म्हणाले, “बदनामी ही फक्त…”

मिळालेल्या माहितीनुसार, सागरचे कुटुंब उसतोडणीसाठी मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ते कामाला होते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सागर खेळत असताना शेतातील बोरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सारगला वाचवण्यासाठी समांतर दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आलं. त्याला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच सागरचा दुर्देवी मृत्यू झाला.

हेही वाचा – वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

दरम्यान, २०१७ मध्येही अशाच प्रकारची एक घटना अहमदनगरमध्ये घडली होती. त्यावेळी ७ वर्षांचा एक मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला होता. गेला काही वर्षात बोअरवेलमध्ये पडून अशा प्रकारे अनेक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five year old boy died after fall in borewell ndrf rescue operation failed spb