सातारा: एकीकडे अतिवृष्टी, पूर यामुळे अगोदरच उत्पादनात घट आलेली असताना यातून वाचवलेल्या फुलांनाही ऐन नवरात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर दर मिळत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. तयार फुले खराब होऊ नयेत म्हणून अतोनात कष्ट करत बाजारात आणलेल्या या फुलांना मिळेल त्या दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अतिवृष्टी आणि बाजारातील दर घसरणीमुळे साताऱ्यातील फूल उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत.

यावर्षी जास्त पाऊस असूनही अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने फुले लावली, पिकवली आहेत. मात्र सध्या बाजारभाव अत्यंत कमी आहे. गणपती उत्सवापासून झेंडू, शेवंती, बिजली, अस्टर, गुलाबाची गड्डी स्वस्तात मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या मुंबईतील दादर फूल बाजारात व्यापारी १०० रुपये किलो दर देत आहेत. पुण्याचे ६० ते ८० भाव देतात. इतर बाजार समित्यांमध्ये फुलांची आवक वाढली. परिणामी सर्व पिकांच्या बाजारभावावर परिणाम झाला. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या फुलांना बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शासनाने कृत्रिम फुलांवर बंदी जाहीर केली, पण अंमलबजावणी झाली नाही. हा निर्णय फक्त कागदावर राहिला आहे. त्यामुळे गणपती उत्सवात व सध्या फुलांचे बाजारभाव कोसळले आहेत. नवरात्रात ३० ते ४० रुपये किलो मिळणारी झेंडूची फुले किरकोळ बाजारात सध्या पन्नास ते सत्तर रुपये किलो विकली जात आहेत.

मागणी वाढली तर भाव वाढतील अशी चर्चा व्यापारी वर्गात होती. मात्र दरामध्ये फारशी प्रगती झाली नाही. यावर्षी मे महिन्यापासून पावसाळा राहिल्याने शेतकऱ्यांना फुलांची लागवड करता आलेली नाही. फुलांची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यात पावसामुळे शेतात पाणी साठून कुजण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे.

माझ्या शेतात आठ हजार झेंडूची रोपे लावली आहेत. यावर्षी मागील चार महिन्यांत पावसाळा राहिल्याने जास्तीची लागवड करता आलेली नाही. झेंडूच्या दोन ओळीतून चालता व पिकाची काळजी घेता येईल यासाठी मोठी सरी घातली आहे. साडेतीन ते चार टन माल निघत आहे. पुण्यातील व्यापारी जागेवर येऊन फुले खरेदी करत आहेत. यावेळी जागेवर ६० रुपये किलो भाव मिळत आहे. मात्र आतापर्यंत पावसामध्ये पीक टिकवताना झालेला त्रास आणि खर्च पाहता भाव वाढीची अपेक्षा आहे. – जयवंत जाधव, मिरजे, तालुका खंडाळा