मिरजेपासून १२ किमी अंतरावर म्हैसाळ येथे १९ अर्भकांच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांना सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या भागातील बीएचएमएस डॉक्टराने अवैध गर्भपात करून अपूर्ण वाढलेले अर्भक पुरले होते. या प्रकरणातील संशयित डॉक्टरने पळ काढला असून पोलिसांनी त्याच्या कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
चार दिवसांपूर्वी मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहित तरुणीचा गगर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाल्याने या प्रकाराला वाचा फुटली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत तरुणीचा पती प्रवीण परशुराम जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय व्यावसायिक बाबासाहेब खिद्रापुरेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे.
१ मार्च रोजी स्वातीला म्हैसाळ येथील भारती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तिचा गर्भ पाडण्यात आला. गर्भ पाडताना अतिरक्तस्त्राव झाल्याने स्वातीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रवीणने घाईघाईने तिचा अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नक्कीच काही गैरप्रकार आहे असा संशय विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना आला आणि त्यांनी पोलिसांकडे हे प्रकरण नेले. पोलिसांकडे हे प्रकरण जाताच तिचा गर्भ पाडताना मृत्यू झाल्याची बाब प्रवीणने पोलिसांना सांगितली.
तिचा गर्भ ओढ्या-काठाला पुरण्यात आल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी खोदकामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अपूर्ण वाढ झालेले काही अर्भक सापडले. हे मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घालून ओढ्याकाठाला मातीत पुरण्यात आले होते. आतापर्यंत एकूण १९ अर्भकांच्या मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. पोलीस जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करुन अर्भक काढण्याचे काम करत आहेत. हे अर्भक स्त्री जातीचे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुलगी नको म्हणून अनेक जण अवैधरित्या गर्भ पाडण्यासाठी या ठिकाणी येत असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बाबासाहेब खिद्रापुरे आणि त्याची पत्नी हे दोघे या भागात रुग्णालय चालवत होते. या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात केला जात असे. हे दोघेही बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर आहेत. गर्भपात झाल्यानंतर ओढ्या-काठाला गर्भ पुरला जात असे. पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातही खोदकाम करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास उप-अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.