पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ८८ गावांतील ग्रामस्थांना १० किलो गहू, १० किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहेत. सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी पोलीस, महसूल प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. तर, पूरग्रस्त गावांत ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच ८८ गावांत स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आदी सुविधा पूर्ववत करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोलापूर येथे पूरस्थिती आणि पुढील कारवाईबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी यांनी, २१ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर, धाराशिव येथे मोठ्या प्रमाणत पाऊस पडला. त्याचा परिणाम सीना नदीत पाणी मोठ्या प्रमाणात आले. या पुराच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्याना बसला. जिल्ह्यात ६ तालुके पुराने बाधित झाले आहेत. या वेळी नागरिकांना पोलीस, महसूल प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. मात्र, काही नागरिकांनी स्थलांतर न केल्याने प्रशासनाला त्यांना शोधून त्यांचा बचाव करून सुरक्षित ठिकाणी आणावे लागले. आता पुढील चार दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफची ३, तर लष्कराची १ टीम मदतीला होती. यासह २५ बोटी, १५० मनुष्यबळ यांच्या मदतीने बचाव कार्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
पूरग्रस्त ८८ गावांतील ग्रामस्थांना १० किलो गहू, १० किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. जनतेमधून मदत करायची असेल, तर तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय परवानगीची गरज नाही. नागरिकांनी गहू पीठ, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, कपडे, प्लास्टिक ताडपत्री, टॉर्च, जीवनावश्यक भांडे, साबण, बदली, मग, बिस्कीट पॅकेट, फूड पॅकेट, चादर, ज्वारीचे पीठ, हरभरा डाळ, मीठ, मसाला, हळद, तेल, सतरंजी, मिल्क पावडर आदी वस्तू द्याव्यात जेणेकरून नागरिकांना तत्काळ उपयोगात येतील, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, पूरग्रस्त ८८ गावात ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गरजेनुसार वाढवून पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पाणी पूर्णपणे ओसरले, की विद्युतपुरवठा पूर्ववत केला जाईल. गावातील पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजना सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून जवळपास १ हजार टन चारा उपलब्ध केला जाणार आहे. यातील ३० टन चारा उपलब्ध झाला असून तो बाधित गावांत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी ७२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आरोग्य तपासणी सुरू केली आहे. तसेच पुढील चार दिवसांनंतर ८८ गावांत स्वच्छता मोहीम राबवून गावे चकाचक करणार आहे. तसेच आरोग्य शिबिर घेणार असल्याचे जंगम यांनी सांगितले.