-मंदार लोहोकरे 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या आषाढी वारीला गर्दी होऊ नये म्हणून शहरात दि. २९ जून ते २ जुलै असे चार दिवस संचारबंदी लागू केली जाणार असल्याचे जवळपास निश्चित असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्यात आला असल्याचे सांगण्यता आले आहे. तसेच या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे.जर कोणी पंढरीत जात असल्याचे निदर्शनास आले तर कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी आषाढी वारीच्या काळात पंढरपूरला येऊ नये, असे वाहन प्रशासनाने केले आहे.

दरवर्षी पंढरीत येणाऱ्या भाविकांना पोलीस प्रशासन नेहमी मदत करत होते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांना परवानगी शासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढी वारीसाठी जवळपास १५०० पोलीस बंदोबस्त राहणार आहे. पंढरपूरला येण्यासाठी आता राज्यातून परवानगी देणे बंद केले आहे. तरी देखील जिल्हा प्रवेश,तालुका प्रवेश आणि शहराच्या लगत अशा तीन ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून दि २९ जुने ते २ जुलै या चार दिवसा करीता संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. तर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला १० मास्क, सी व्हीटॅमिनच्या गोळ्या, फेस शिल्ड आणि रेनकोट असे साहित्य दिले आहे. या शिवाय दररोज पोलीस कर्मचाऱ्यांचे थर्मल टेस्टिंग आणि इतर तपासणी करणार असल्याची माहिती उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली. दरम्यान,यंदा नागरिकांनी पंढरीत येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four days curfew in pandharpur on the backdrop of ashadi wari msr