अहिल्यानगर : राज्य सरकारचे साहित्य व सांस्कृतिक मंडळ आणि येथील आत्मनिर्धार फाउंडेशनच्या समन्वयातून नगर शहरात ८ व ९ नोव्हेंबर असे दोन दिवसीय स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाध्यक्षपदी कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजक सचिन चोभे यांनी दिली. संमेलन शहराजवळील सुखकर्ता लॉन (नेप्ती बाह्यवळण चौक, कल्याण रस्ता) येथे होणार आहे.

अधिक माहिती देताना फाउंडेशनचे महादेव गवळी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या उद्देशाने संमेलनास त्यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनात अभिजात मराठी भाषा जपण्यासाठीच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीने शेतकरी व कष्टकऱ्यांवर संकट ओढावले आहे. तसेच जाती-धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संमेलनात या परिस्थितीवर चर्चा होण्यासाठी सत्र आयोजित केले जाणार आहे. नगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यातील साहित्यिक, कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.

दोन दिवसीय साहित्य संमेलनात व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण, परिसंवाद, काव्यसंमेलन होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सुरू आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा निरीक्षक बी. जी. शेखर व डॉ. राजेश गायकवाड यांचे सहकार्य त्यासाठी मिळत असल्याचे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष सिद्धनाथ मेटे महाराज यांनी सांगितले.संमेलनासाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका यांची मदत घेतली जात आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे रामदास कोतकर यांनी सांगितले.

जोडसंमेलनस्थळी पुस्तक प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालने असतील. नगरमधील आत्मनिर्धार फाउंडेशन ही संस्था पर्यावरण व साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवते. यापूर्वी संस्थेने राजश्री शाहू स्मृती शताब्दीनिमित्त सन २०२२ मध्ये साहित्य संमेलन आयोजित केले होते. यंदाच्या संमेलनास नामांकित व नवसाहित्यिकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. महिला साहित्यिकांनाही विशेष संधी देण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. संमेलनाच्या माध्यमातून सेनापती बापट यांच्या साहित्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. तसेच संमेलन नेटके व काटेकोर आयोजित करण्यासाठी प्रयत्न असल्याचे संयोजक सचिन चोभे यांनी सांगितले. नगरमधील साहित्यिक व साहित्य रसिकांनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.