सांगली : जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून पेट्रोल, डिझेल वितरण सुरळीत आहे. नागरिकांनी अफवावर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मंगळवारी केले. सोमवारी इंधन वाहतूक करणार्‍या चालकांचा संप असल्याची अफवा पसरल्याने पेट्रोल, डिझेल वितरण केंद्रावर मोठ्या रांगा  लागल्या होत्या. मात्र आज वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांच्या संपाच्या पार्डभूमिवर जिल्हा प्रशासनातर्फे महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल इंधन डेपो व्यवस्थापक, तिन्ही कंपन्यांचे समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी व अन्य विक्री व्यवस्थापक यांची तातडीची संयुक्त बैठक मंगळवारी झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

हेही वाचा >>> “…तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार?” जरांगे-पाटलांचा बैठकीत मुख्यमंत्र्यांना सवाल

या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा, तसेच संपामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहतूक व वितरणावर झालेल्या परिणामाचा, वाहतूकदारांना येणार्‍या अडचणींचा आढावा घेण्यात आला. वाहतूकदार संघटना व डेपो व्यवस्थापक यांनी त्यांची बाजू मांडली. तसेच, प्रत्येक डेपोला गरजेनुसार 2 पोलिसांचा बंदोबस्त देण्याचे तयारी जिल्हा प्रशासनातर्फे दर्शवण्यात आली.

श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले,  कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे. जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलजन्य पदार्थांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर विपरित परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, डेपो मॅनेजर, वाहतूकदार व डीलर्स यांच्यामध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. महसूल व पोलीस अधिकार्‍यांची पथके तयार करून पेट्रोलपंपांच्या इंधनाचा साठा तपासला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, भविष्यात संपांची वेळ आली तर आगाऊ साठा करून ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांनी तिन्ही कंपन्यांनी सांगली जिल्ह्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अपवादात्मक स्थितीत पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे वाहनचालक वाहतुकीस विरोध करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel supply smooth in sangli says collector trupti dhodmise zws