अहिल्यानगर: महावितरणच्या रोहित्रांमधील तांब्याच्या धातूची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. या टोळीतील ६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख २३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

मच्छिंद्र रामदास काळे (वय ५०), सागर मच्छिंद्र काळे (वय १९), श्याम विष्णू पवार (वय २६), विष्णू सरदार पवार (वय ६५, सर्व रा. नवसरवाडी, कर्जत, अहिल्यानगर), किशोर खेलू पवार (वय ४५, मार्डी, सोलापूर) व राजकुमार मधुकर भोपळे (रा. ढोकी, धाराशिव) या सहा जणांना अटक करण्यात आली. याशिवाय सचिन विष्णू पवार (नवसरवाडी), शिवाजी विष्णू पवार (नवसरवाडी) व प्रवीण ऊर्फ पवन पवार (शिर्डी, राहता) हे तिघे फरार आहेत.

या टोळीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक कबड्डी यांनी सांगितले. दि. २२ सप्टेंबरला शिंदे (ता. कर्जत) गावच्या शिवारातील तुकाई चारी उपसा सिंचन वीज उपकेंद्रातील हायरायझर कंपनीच्या रोहित्रातील २५ लाख ७२ हजार ४०० रुपये किमतीचे तांबे व ऑइल चोरट्यांनी चोरून नेले होते. या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलीस निरीक्षक कबड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, अरुण मोरे, सोनाली भागवत यांच्या पथकाने आरोपींची माहिती काढून त्यांना अटक केली.

यातील प्रमुख आरोपी किशोर पवार याच्याविरुद्ध सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये घरफोडी व चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. महावितरणच्या रोहित्रामधील तांबे धातू व ऑइल चोरीच्या घटनांनी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहे. रोहित्रामधील साहित्याची चोरी होत असली, तरी महावितरण त्याच्या सुरक्षेसाठी उपाय करत नाही. रोहित्र बंद पडल्यानंतर ते बदलण्यासाठी, त्याची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणकडे वारंवार चकरा माराव्या लागतात. यापूर्वी मंत्र्यांच्या बैठकीतही शेतकऱ्यांनी रोहित्र बसवण्यासाठी पदरमोड, वर्गणी करावी लागत असल्याची तक्रार केली होती. रोहित्रामधील धातू व ऑइलला बाजारात मोठी किंमत असल्याने त्याच्या चोरीच्या घटना घडतात. या चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत.