नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे आता त्यांनी विधानसभेचं तरी जागावाटप वेळेत व्हावं अशी अपेक्षा केली आहे. तसंच, नाशिकमधून लढवण्याची माझी इच्छा होती, परंतु जागावाटप उशिराने झाल्याने मी माघार घेतली, असं छगन भुजबळ बोलले आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नाशिकची लोकसभा लढवायला मी तयार झालो होतो. दिल्लीतून तिकिट फायनल केल्यामुळे मी कामाला लागलो होतो. एक महिना निकाल जाहीर होईना (उमेदवारी जाहीर होईना). त्यामुळे म्हटलं बस झालं. समोरचा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागला आहे. माघार घेतल्यानंतर १५ दिवासंनी उमेदवारी जाहीर झाली. याच परिणाम जय पराजयावर होत असतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >> “युतीतला जागावाटपाचा प्रश्न सोडवा, पवार प्रचारालाही लागले!” लोकसभेची चूक विधानसभेत नको म्हणून छगन भुजबळांना घाई?

तसंच, आज त्यांनी विधानसभेसाठी जागा वाटप त्वरीत जाहीर करण्याचंही आवाहन केलं. लहान, मोठा, मधला भाऊ कोण आहे ते आधीच ठरवून टाका, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ महायुतीतील जागावाटपावरून नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभेनंतर राज्यसभेतही संधी न मिळाल्याने त्यांनी आता त्यांचा मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. परंतु, लोकसभेसारखी चूक विधानसभेतही झाली तर पुन्हा पराजयचा सामना करावा लागले, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. यावरून शिंदे गटाच्या आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ कोणत्या गोष्टींवर खुश होतात?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “छगन भुजबळ कोणत्या गोष्टींवर खुष होतात यावर संशोधन केलं पाहिजे. मतदारसंघाच्या वेळीही आणि आताही त्यांची नाराजी आहे. अंतर्गत पक्षाचा निर्णय असल्याने यावर भाष्य करणं योग्य नाही. त्यामुळे पक्षातील नाराजी असली तरीही त्याचा पिरणाम महायुतीवर होतो. त्यामुळे महायुतीला हे परवडणारं नाहीय. छगन भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका. यामुळे वातावरण गढूळ होत जातंय. माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.”

विधानसभेबाबत छगन भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, “लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा. कारण, आपण पाहत आहोत की पवार साहेब कामाला लागले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला सुरुवात करावी लागली. आपण तेच तेच करत बसलो चर्चेचं गुऱ्हाळ करत तर परत अडचणीत येऊ.”