दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्या चबुतऱ्याचे दर्शन घेऊन लोकांच्या झुंडी परळीतील ‘यशश्री’ बंगल्यावर येतात. गावागावांतून आलेल्या महिला, आबालवृद्ध आमदार पंकजा पालवे यांना भेटतात. ताई दिसताच धाय मोकलून रडत, स्वत:ला सावरत, साहेबांची आठवण सांगत, ताई खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर देतात. मागील आठ दिवसांपासून सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत देशभरातून आलेल्या चाहत्यांना मुंडे यांच्या पत्नी व तिन्ही मुली भेटत आहेत. हजारोंच्या संख्येने येणारे लोक, त्यांच्या आठवणी, हुंदक्यांनी ‘यशश्री’ अश्रूंचा नाथसागरच झाला आहे.
मुंडे यांचे ३ जूनला अपघाती निधन झाले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा जनसागर लोटला. आपल्या पित्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे भावना अनावर झालेल्या समुदायाला आमदार पंकजा पालवे यांनी धीरोदात्तपणा दाखवत सावरले. अंत्यसंस्कारानंतर परळीतील मुंडे यांच्या ‘यशश्री’ बंगल्यावर देश-राज्यभरातून मंत्री, खासदार, आमदार यांच्याबरोबरच सर्वसामान्य लोकांची रीघ लागली आहे. झुंजार पित्याच्या मृत्यूच्या दु:खातून स्वत:ला सावरत आमदार पंकजा पालवे मुंडेंच्या चाहत्यांना भेटत आहेत. गावागावांतून वाहने बांधून महिला, पुरुष, तरुण-तरुणींच्या झुंडी येतात. सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी थांबता थांबत नाही. अंत्यसंस्कार झालेल्या चबुतऱ्याचे दर्शन घेऊन लोक बंगल्यावर दाखल होतात. रांगा लावून आमदार पालवे यांना ‘ताई, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, खचून जाऊ नका’ असा धीर देतात. महिलांना भावना आवरणे कठीण जाते, तेव्हा अनेक जण धाय मोकलून रडतात.
ज्या ‘यशश्री’ बंगल्यावर गेली अनेक वष्रे मुंडे यांचा वावर कायम गर्दीत असायचा, त्याच बंगल्यातून राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी घडत असत. त्यामुळे देशातील राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांना ‘यशश्री’ची सवय झाली होती. मात्र, याच बंगल्यावर आता मुंडे यांच्या हार घातलेल्या प्रतिमा दिसत असल्याने त्यांच्या चाहत्यांना अश्रू आवरणे कठीण जात आहे. मुंडे यांनी ४० वर्षांच्या राजकीय जीवनात देशभर जोडलेल्या माणसांचे प्रेम पाहून मुंडे यांची पत्नी प्रज्ञा, तसेच तिन्ही कन्या पंकजा, डॉ. प्रीतम, यशश्री आभाळाएवढय़ा दु:खातून सावरत लोकांना भेटत आहेत. गर्दीतील अनेक जण ‘ताई, आता पुढील आयुष्य तुमच्यासाठी काम करणार’ असा संकल्प सोडून पित्याच्या दु:खातून सावरण्याची शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंडे यांचे दोन्ही जावई अमित पालवे व गौरव खाडे हेही आलेल्या लोकांचे सांत्वन करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glimpse of nathsagar on yashshree