केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, जणू यमाच्या दारातूनच माघारी आलो. सिद्धेश्वरावरील श्रद्धेनेच आम्हाला वाचवले. यात्रा रद्द झाल्यामुळे देवदर्शन होऊ शकले नाही. मात्र त्या ठिकाणी मानवतेच्या रूपाने वेगळय़ा स्वरूपात देवदर्शन झाले!
मध्य प्रदेशात मागील आठवडय़ात झालेल्या भीषण रेल्वे अपघातातून वाचलेले बापूसाहेब भाटे यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. अकोले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. भाटे हे पत्नी मंगल, मोठे बंधू व अन्य काही नातेवाईक व इतर असे तेरा जण एका यात्रा कंपनीमार्फत अलाहाबादकडे निघाले होते. सायंकाळी नाशिक रोड स्थानकावर हे सर्व जण रेल्वेत बसले. साडेअकराच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. ते ज्या बोगीत बसले होते ती बोगी कलंडली. अपघात घडला त्या वेळी सर्व जण झोपेत होते. धक्क्याने काही जण बर्थवरून खाली पडले. एकच हलकल्लोळ झाला. नक्की काय झाले हे आधी कोणाच्याच लक्षात आले नाही. बराच वेळ आरडाओरडा, रडारड असा गोंधळ सुरू होता. नंतर पुराच्या पाण्यामुळे रेल्वेरुळाखालील भराव वाहून गेल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आले.
त्यांच्या वाराणसी एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले होते. सर्वत्र दाट काळोख होता. पाऊसही पडत होता. पुढच्या डब्यातील काही जणांनी घाबरून उडय़ा मारल्या. पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर काही जण वाहून गेले. त्याच वेळेला समोरून येणारी जनता एक्सप्रेसही अशीच अपघातग्रस्त झाली. त्याची एक बोगी कलंडू पाहणाऱ्या डब्याखाली आली आणि भाटे व त्यांचे सहकारी बसले होते. तो डबा पाण्यात आडवा होता होता बचावला. अडीच-तीन तासांनंतर काही स्थानिक लोक अपघातग्रस्त गाडीकडे मदतीसाठी आले. त्यांच्या मदतीने डब्यातील एक एक जण खाली उतरले व काही अंतरावर रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसले. सकाळी दहापर्यंत ते तेथेच मदतीसाठी बसून होते.
नंतर खासगी गाडीने सर्व जण हरदा या जिल्हय़ाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे मदतीसाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते जमले होते. अपघातग्रस्तांसाठी चहा, नाश्ता, वैद्यकीय सुविधा यांची सोय करण्यात आली होती. त्या गर्दीतच गोखले नावाच्या एका गृहस्थांशी त्यांची गाठ पडली. त्यांच्या विनंतीवरून भाटे व त्यांचे सर्व सहकारी तेथील महाराष्ट्र मंडळात मुक्कामाला गेले. गोखले यांच्याबरोबरच सहस्रबुद्धे, गोडबोले, कुलकर्णी आदींनी सर्व अपघातग्रस्तांची विशेष काळजी घेतली.
दुसऱ्या दिवशी खासगी गाडीने कार्यकर्त्यांच्या मदतीने भाटे व त्यांचे दोन सहकारी अपघातग्रस्त ठिकाणी दाखल झाले. तेथील दृश्य पाहून सर्वानाचा धक्का बसला. त्यांच्या रेल्वे डब्याच्या खाली पंधरा फूट खोल खड्डा पडला होता. त्यातून पाणी वाहात होते. केवळ दैवयोगानेच त्यांचा डबा पाण्यात पडता पडता बचावला होता. पुढचे तीन डबे पुराच्या पाण्यात आडवे झाले होते. अपघातस्थळी तोपर्यंत पोलीस व अन्य शासकीय कर्मचारी दाखल झाले होते. सुदैवाने डब्यातील त्यांचे सर्व सामानही सुरक्षित होते. सरकारी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सामान ताब्यात घेतले व सर्वच हरदा येथे परतले. दुसऱ्या दिवशी पुढील यात्रा रद्द करून खासगी वाहनाने गावी परतले. निघताना महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘देवदर्शन हुकले, मात्र मानवतेच्या रूपात देव भेटला!’
केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, मानवतेच्या रूपाने वेगळय़ा स्वरूपात देवदर्शन झाले! भीषण रेल्वे अपघातातून वाचलेले बापूसाहेब भाटे यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

First published on: 13-08-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God met as humanity experience of family who suffered accidents