कोट्यवधी भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या कुलस्वामिनी तुळजाभवानीचा खजिनाही अनमोल आहे. माणिक, मोती, पाचू, हिरकणी, पुष्कराज आणि सोन्याच्या राशींचा ढीग डोळे दिपविणारा आहे. शेकडो वर्षांपासून महत्वाच्या उत्सवात देवीची महालंकार पूजा याच आभुषणाने केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेली १०१ सोन्याच्या मोहरांची माळ आणि छत्रपती संभाजी महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेले ६० किलो वजनाच्या दोन चांदीच्या सिंहांचे दर्शन देशभरातील भाविकांना पहिल्यांदा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा थेट संबंध अधोरेखित करणारा ऐतिहासिक दस्तऐवज या निमित्ताने समोर आला आहे. देवीच्या खजिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेली १०१ मोहरांची अडीच फूट व्यास असलेली दोन पदरी सोन्याच्या मोहरांची माळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका पदरात ५२ तर दुसर्‍या पदरात ४९ मोहर आहे. या माळेचे वजन दीड किलोपेक्षा अधिक आहे. प्रत्येक मोहरवर एका बाजूने छत्रपती शिवाजी तर दुसर्‍या बाजूने श्री तुळजाभवानी अशी अक्षरे कोरलेली आहेत. त्याचबरोबर एक हजार सातशे पुतळ्या असलेली पावणे दोन किलो वजनाची सात पदरी माळ फ्रेंच सेनापती भुसी याने अर्पण केली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या पुतळ्यांची चकाकी आजही थक्क करणारी आहे.

पाचशे वर्षांपेक्षा जुना असलेला देवीचा मुकूट अस्सल कलाकुसरीचा नमुना आहे. मध्यभागी पुष्कराज हिरा, चारही बाजूने चकाकणारी गुलाबी मानके, माणिक-मोत्यांचा स्वतंत्र शिरपेच तुळजाभवानी देवीचा रूबाब सांगण्यासाठी पुरेसा आहे. या मुकूटावर हिर्‍यांच्या कलाकुसरीत महादेवाची पिंड कोरण्यात आली आहे आणि पिंडीवर हिरकणीच्या माध्यमातून बेलाच्या पानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुकूटाच्या वर लावला जाणारा कलगीतुरा आणि त्यात जडविण्यात आलेल्या माणिक मोती आणि पाचूंची आकर्षक रांग पाहत राहावी, अशीच आहे. एकूण सात पेट्यांमध्ये देवीचा खजिना ठेवण्यात आला आहे. अत्यंत प्राचीन अशा या दागिन्यांवरील जाळीदार नक्षीकाम निजामशाहीच्या संस्कृतीचा प्रभाव ठळकपणे मांडणारा आहे. काही दागिने थेट तेराव्या शतकाशी निगडीत असल्याचाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नित्योपचार पूजेसाठी असलेल्या दागिन्यांव्यतिरिक्त हा प्राचीन खजिना तुळजाभवानी देवीची श्रीमंती विशद करण्यासाठी पुरेसा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goddess tuljabhavni temple antique ornaments in the era of shiv kalin portuguese and nizam