कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती गंभीर असली, तरी ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांतर्फे देण्यात आली. त्यांच्यावरील एक शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यामुळे त्यांच्या मानेतून होणारा रक्तस्राव थांबल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. मात्र, पानसरे यांच्यावर अजून दोन शस्त्रक्रिया होणार असून, येत्या दोन तासांनंतरच त्यांच्या प्रकृतीबद्दल ठोस निदान करता येईल, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. दामले यांनी दिली. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असली तरी त्या शुद्धीत असून वैद्यकीय उपचारांना योग्य तो प्रतिसाद देत आहेत. उमा पानसरे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या मेंदूतही रक्तस्राव झाला असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind pansare health stable but still in severe condition