गारपीटग्रस्त भागातील दादाभाऊ जाधव यांना अवघ्या २२ हजार रुपयांची मदत मिळाली. मात्र सरकारने गारपीटग्रस्तांना १२ हजार कोटी रुपयांची मदत केल्याची जाहिरातबाजी करताना दादाभाऊंचा फोटो झळकवला. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी व माध्यमांनी भाऊंना अक्षरश: भंडावून सोडले. एवढे की, भाऊंवर भूमिगत होण्याची वेळ गुदरली. मदत नको, पण हे झंझट आमच्या मागे का, असा त्यांचा सवाल आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय बांधणी करण्यासाठी मराठवाडय़ात दौरा करणारे तत्कालिन कृषिमंत्री शरद पवार यांना गारपीट झाल्याचे कळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ताडसोन्ना परिसरात पाहणी केली होती. याच परिसरातील िपपळनेर गावातील दादाभाऊ काशिनाथ जाधव हे पत्नी व मुलांसह गावांपासून अध्र्या किलोमीटर अंतरावरील शेतामध्येच राहतात. २० एकर शेती असलेल्या दादाभाऊंनी पंचनाम्यासाठी तलाठय़ाचे सोपस्कार पूर्ण केले. तेव्हा जाधव यांना अवघ्या २२ हजारांची मदत मिळाली. १२ हजार लोकसंख्येच्या गावातील ६० टक्के शेतकऱ्यांना पंचनामे होऊनही मदत मिळालीच नाही. पंचनामे करताना तलाठय़ाने घोळ घातले. प्रत्यक्षात गारपीट झाली तेव्हा मोठय़ा प्रमाणात पिकांची काढणी झाली होती. त्यांचेही नुकसान झाले होते. मात्र ते गृहीत धरले गेले नाही. मागील पाच दिवसांपासून काँग्रेस आघाडी सरकारच्या वतीने केलेल्या कामाच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. त्यात जाधव यांचा चेहरा होता. फारसा कोणाला माहीत नसलेला दादाभाऊ जाधव यांचा फोटो झळकल्याने ते चर्चेत आले. आपल्या गावातील दादाभाऊला किती मदत मिळाली? अधिकाऱ्यांनी दादाभाऊलाच मदत कशी दिली? त्याचाच फोटो कसा आला, असे विचारत लोकांनी दादाभाऊंना गाठून भंडावून सोडले. जिल्हय़ावरील प्रसारमाध्यमांचे लोकही दादाभाऊलाच किती मदत मिळाली, याचा शोध घेत शेतावर पोहचले. शेतात काम करत असलेल्या दादाभाऊला काहीच कळेनासे झाले. ते गांगरले आहेत. ते म्हणाले, तलाठय़ाने मला आणखी जास्तीची मदत मिळणार आहे म्हणून फोटो काढून नेला. आता मदत नको, पण हे झंझट कशाला? आम्ही गरीब माणसे असे म्हणत माणसांपासून भाऊ दूर पळत आहेत. आता तर रोजच्या कटकटीने भाऊ भूमिगतच झालेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2014 रोजी प्रकाशित
सरकारच्या जाहिरातीत फोटो झळकल्याने गारपीटग्रस्त ‘पोस्टर बॉय’ भूमिगत
गारपीटग्रस्त भागातील दादाभाऊ जाधव यांना अवघ्या २२ हजार रुपयांची मदत मिळाली. मात्र सरकारने गारपीटग्रस्तांना १२ हजार कोटी रुपयांची मदत केल्याची जाहिरातबाजी करताना दादाभाऊंचा फोटो झळकवला.
First published on: 15-08-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm poster boys underground