राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उत्तम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयातील सुमारे २५ ‘फेलोशीप’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसह प्रशिक्षण कार्यक्रमांच्या शुल्कात थोडीथोडकी नव्हे तर, दुप्पट ते पाचपट वाढ केली आहे. काही फेलोशीप अभ्यासक्रमांचे २० हजार रुपयांचे शुल्क एक लाखावर तर  प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे शुल्क ५० हजारापर्यंत वाढवण्यात आले आहे. जुन्या शुल्काच्या आधारे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर विद्यापीठाने अचानक शुल्कवाढीची सूचना दिल्यामुळे काही महाविद्यालये कोंडीत सापडली आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांची कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने अत्याधुनिक खासगी रुग्णालये व महाविद्यालयांच्या सहकार्याने विशेषतज्ज्ञ, उपतज्ज्ञ फेलोशीप व प्रमाणपत्र असे शिक्षणक्रम राज्यात सुरू केले. ऑप्टीमोलॉजी, ऑर्थोपेडिक्स सारख्या विद्या शाखांमध्ये अनेक उपविशेषतज्ज्ञ असतात. त्या धर्तीवर वेगवेगळ्या विद्याशाखेत सुमारे २५ विशेषतज्ज्ञांचे फेलोशीप कार्यक्रम सुरू करण्यात आले. मात्र, आता या शिक्षणक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवण्यात आले आहे.
या शुल्कवाढीची माहिती विद्यापीठाने ११ जुलै रोजी दिल्यामुळे जुन्या शुल्कानुसार प्रवेश प्रक्रिया राबविणारी महाविद्यालये कात्रीत सापडली. या सर्व शिक्षणक्रमांच्या व्यवस्थापन खर्चापोटी आरोग्य विद्यापीठ संबंधित संस्थांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शुल्कातील २० टक्के रक्कम घेत होते. या रकमेत आता पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यामुळे फेलोशीप शिक्षणक्रमासाठी प्रती विद्यार्थी २५ हजार, प्रमाणपत्र अभ्यासक्रम १२,५००, प्रशिक्षण कार्यक्रम ६,२५० आणि ‘ऑप्टोमेट्री’ आणि ‘ऑथलमिक सायन्स’ शिक्षणक्रमातून प्रत्येकी १५,००० रूपयांची कमाई विद्यापीठ करणार आहे.
शिक्षणक्रम        शुल्क
* एक वर्ष कालावधीसाठीचे        एक लाख
* सहा महिने कालावधीसाठीचे        ५० हजार
* तीन महिन्यापर्यंतचे        २५ हजार
* ‘ऑप्टोमेट्री’ -‘ऑथलमिक सायन्स’        ६० हजार
* फेलोशिप इन पंचकर्म/क्षारसूत्र        एक लाख
सर्व प्रक्रियेनंतरच शुल्कवाढ
फेलोशीप व प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील शुल्कवाढीसाठी विद्यापीठाने समितीची स्थापना केली होती. या समितीने दिलेला प्रस्ताव विद्वत परिषदेसमोर ठेवण्यात आला. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा विषय व्यवस्थापन मंडळासमोर ठेवण्यात आला. शुल्क वाढसंदर्भातील विहित प्रक्रिया पूर्ण करून या बाबतचा निर्णय झाला असल्याची माहिती कुलसचिव आदिनाथ सूर्यकर यांनी दिली. यासंदर्भात कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.