जिल्ह्यात २७ फेबुवारी ते ६ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ५४१ घरांना या नुकसानीची अंशत झळ पोहोचली. गारपिटीत २३ जनावरे दगावली. जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम सुरू झाले असून, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी सेलू, पाथरी आदी तालुक्यांच्या नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. जिल्ह्यात एकूण ७५ हजार हेक्टरमध्ये शेतातील पीके व फळबागांना हानी पोहोचली.
जिल्ह्यात दोन वेळा गारपीट झाली. पावसाळी वातावरण कायम असून उन्हाळ्यातही पावसाळ्याचा अनुभव घडत आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले. फळपिकांच्या बाबतीत सेलू, पूर्णा, मानवत तालुक्यांचे नुकसान अधिक आहे. तालुकानिहाय अंदाजे बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे – परभणी (१ हजार ६१४), जिंतूर (१२ हजार ६६७), सेलू(१४ हजार ३२०), पाथरी (१ हजार ६५९), मानवत (३ हजार ९१४), सोनपेठ (६ हजार १५), गंगाखेड (१७ हजार ७४७), पालम(१६ हजार ७३५), पूर्णा (१ हजार ८११). जिल्ह्यात एकूण बाधित क्षेत्र ७६ हजार ४८२ हेक्टर असून, यात ७८६ हेक्टर फळपिकांचा समावेश आहे.
अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. यात सोनपेठ तालुक्याचे नुकसान सर्वाधिक आहे. सोनपेठमध्ये ५२५ घरांचे नुकसान झाले. पाथरीत ११, तर गंगाखेडमध्ये ५ घरांचे नुकसान झाले. शेती, फळपिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार आधारीत असून, गठीत पथकांकडून जे सर्वेक्षण होईल, त्यातून आणखी माहिती समोर येऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सिंह यांनी सेलू तालुक्यात अवकाळी पावसामुळे नष्ट झालेल्या शेतांची पाहणी केली. झोडगाव येथे जि. प. शाळेवरील पत्रे, लोखंडी खांब उडून गेले. सेलू तालुक्यातील ढेंगळी िपपळगाव, धनेगाव, झोडगाव शिवारात मोसंबी, संत्रा, िलबू आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या भागात गारांचे अक्षरश ढीग साठले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी मानवत, सोनपेठ, पाथरी आदी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy damage in parbhani by hailstorm