अहिल्यानगर : जिल्ह्याला रात्री पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. जिल्ह्याच्या उत्तर भागापेक्षा दक्षिणेत पावसाचे प्रमाण अधिक होते. रात्रीच्या पावसाने शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड व नेवासे तालुके जलमय झाले. या तालुक्यातील एकूण २१ मंडळात अतिवृष्टी झाली. शेवगाव व नेवासे तालुक्यातील अनेक घरांतून पुराचे पाणी शिरून नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यास उद्या सोमवारी व परवा मंगळवारी पुन्हा एकदा पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुळा धरण (९९.६७ टक्के-२५९२६ दलघफू) भरल्याने धरणातून आज रविवारी दुपारी ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले आहे. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होणार असल्याने मुळा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात रात्री सर्वदूर पाऊस झाला. दुपारी सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. आजही हवामान विभागाने जारी केला होता. मात्र, अत्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाने खरीप पिकांनाही फटका बसला आहे. सलाबतपूर मंडलात (ता. नेवासे) १४९ तर राशीन (ता. नेवासे) मंडलात १४२ मिमी पाऊस झाला. शेवगावमधील ७, पाथर्डीतील ७, कर्जतमधील ५, नेवासे व जामखेडमधील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. ही मंडले पुढीलप्रमाणे (आकडे मिमीमध्ये)- कर्जत ७९, माहिजळगाव ६८, अरणगाव ६८, शेवगाव ७३.५, बोधेगाव १०२, चापडगाव १०२, ढोरजळगाव ६७, केरळ गाव ८०.३, दहिगावने ८०.३, मुंगी ८८.३, पाथर्डी ६७, माणिकदौंडी ६७, टाकळी ८७.५, कोरडगाव ८६.८, मिरी ६६.८, खरवंडी ८७.५, अकोले ८६.३.
तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- नगर ३०.१, पारनेर १८.१, श्रीगोंदा २१.१, पाथर्डी ७२.४, नेवासे ४२.७, कर्जत ६८.६, जामखेड ३७.४, शेवगाव ८१.४, राहुरी २५.४, राहता १७.४, संगमनेर १५.४, अकोले १०.५, कोपरगाव ६.५ व श्रीरामपूर ३६.९ मिमी.
आमदार विठ्ठलराव लंघे यांचे पंचनाम्यांचे आदेश
सलाबतपूर (ता. नेवासा) येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. सलाबतपूर मंडलात १४९ मिमी पावसाची नोंद झाली. नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क १२ तास तुटला होता. नदीलगतच्या झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अबालवृद्धांनी रात्र जागून काढली. काहींनी स्थलांतर केले. आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संपर्क करून माहिती दिली. खरिपातील मका, सोयाबीन, कपाशी, बाजरी पिकांचेही नुकसान झाले.
४७ घरांची पडझड
रात्रीच्या पावसाने शेवगाव तालुक्यातील २०, नेवासे तालुक्यातील २५ व कर्जतमधील दोन अशा एकूण ४७ घरांची पडझड झाली. याशिवाय शेवगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या ३५ तर नेवासे तालुक्यातील २७ घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला.