अवघ्या चार तासात २८१ मि.मी.च्या वर मुसळधार पाऊस कोसळल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शहरात असा पाऊस पडला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो लोक अडकून पडले आहेत. दरम्यान, जिल्ह्य़ात जोरदार पाऊस सुरूच असून भिवकुंड नाल्यावर एका ऑटोरिक्षातील सहा जण वाहून गेले. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी गाडय़ांमध्ये अडकून पडले आहेत. इरई धरणाचे सर्व दरवाजे आज एक मीटरने उघडण्यात आल्याने अनेक भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रविवार सुरू झालेल्या मुसळधार पावसाने काल गुरुवारी विश्रांती घेतल्यानंतर आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर १२ वाजतापासून अभूतपूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी चापर्यंत सलग कोसळतच होता.
गेल्या २५ वर्षांत इतका मुसळधार पाऊस कधीच झाला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याने मनपाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी पावसाळ्यापूर्वी योग्य पध्दतीने कामे न झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याची ओरड लोक करत आहेत. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ एक ऑटोरिक्षा सहा प्रवाशांसह वाहून गेला.
यातील चौघांना वाचविण्यात यश आले असून एका अनोळखी मुलीचा यात मृत्यू झाला. या मुलींच्या वडिलांचा शोध बल्लारपूर पोलिस घेत असल्याची माहिती ठाणेदार पंजाबराव मडावी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
पालकमंत्र्यांचा ताफा पाण्यात अडकला
मुसळधार पावसात शहरातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत असलेले पालकमंत्री संजय देवतळे व जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर व अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा आझाद बागेजवळ पाण्यात अडकून पडला. यानंतर ही वाहने कशीबशी पाण्यातून काढण्यात आली व कस्तुरबा मार्गाने जात असतांना तेथेही अडकून पडली. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन समोर जात नसल्याचे बघून पालकमंत्री काही वेळासाठी स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांच्या कार्यालयात बसले. पाऊस कमी झाल्यानंतर ते तेथून निघाले आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली.
रेल्वे गाडय़ा थांबवल्या
मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग पाण्याखाली आल्याने दिल्ली-मद्रास-हैदराबाद या मार्गावरील राजधानी एक्स्प्रेस चंद्रपूरला सलग तीन तास, जी.टी. एक्स्प्रेस वरोरा येथे दोन तास, तर त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस बाबुपेठ येथे दोन तास थांबविण्यात आली होती. वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर येथे रेल्वे मार्ग अक्षरश: पाण्याखाली आले होते. त्यामुळे मध्य रेल्वेला गाडय़ा थांबवाव्या लागल्या. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.
* ऑटोतील ६ जण वाहून गेले; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू, वडील बेपत्ता
* ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो अडकले
* आ. मुनगंटीवारांच्या घरातही पाणी
* अनेक मार्ग बंद, रेल्वे गाडय़ाही रोखल्या
* इरई धरणाचे पाण्यामुळे पुन्हा पूरस्थिती
