हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ओरड सुरू झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पहाणी करणार आहे. त्यामुळे यंत्रणा काही प्रमाणात का होईना कामाला लागल्या आहेत.

पावसाळय़ाची सुरुवात होताच मुंबई गोवा महामार्गावर खड्डय़ांचे अवतार कार्य सुरू होते. हे कार्य नोव्हेंबर महिन्यापर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहाते. त्यामुळे खडय़ातून आदळत आपटत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच राहतो. दरवर्षी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होईल अशा वल्गना केल्या जातात. मात्र परिस्थिती सुधारत नाही आणि रस्त्याचे काम होत नाही याची प्रचीती सर्वानाच येते.

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई, ठाण्यातील कोकणवासीय गावागावांत दाखल होत असतात. त्यांच्या या प्रवासात दरवर्षी खड्डय़ांचे विघ्न उभे राहते. जुजबी डागडुजी सोडली तर रस्त्याची दुरुस्ती होतच नाही. महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे रुंदीकरण २०११ साली सुरू झाले होते. हे काम २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२२ चा ऑगस्ट महिना सरत आला तरी रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

इंदापूर ते झाराप या पट्टय़ातील रस्त्याचे रुंदीकरण २०१४ साली सुरू झाले. हे काम २०१६ अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण २०२२ पर्यंत हे कामही पूर्ण झालेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भाग सोडला तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. सामाजिक संस्था, पत्रकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाबाबत नाराजी लक्षात घेऊन अखेर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचा आज महामार्ग पाहणीदौरा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज, शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पनवेलपासून ते रस्त्याची पहाणी सुरू करणार असून, पेण, कोलाड, इंदापूर, महाड, पोलादपूर येथील कामांचा आढावा घेऊन ते पुढे रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. बांधकाममंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुस्तावलेल्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

दुरुस्ती अशी : मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक आयोजित करत प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या संस्था वाढवून येत्या आठवडय़ात प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. या कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या तातडीच्या बैठकीत या कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेण आणि जे. एम. म्हात्रे इन्फ्रा यांसह अन्य तीन कंपन्यांना देण्यात आला. या कंपन्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आत्तापर्यंत जेसीबी, बोझर, सिमेंट काँक्रीटीकरण, डांबरीकरण, हॉटमिक्स्चरच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम सध्या जोरात सुरू केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highways authority finally started filling potholes mumbai goa route ysh