मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व बालकल्याण खात्यातील २०६ कोटी रुपयांच्या चिक्की खरेदी व्यवहाराची चौकशी न करता पंकजा मुंडे यांची पाठराखण केल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर मुंडेंना निर्दोषत्व बहाल केले, असा सवाल त्यांनी केला. अंगणवाडय़ांना पुरवण्यासाठी चिक्की आणि अन्य उत्पादन खरेदीसाठी एकाच दिवशी २४ आदेश काढण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांनी या खरेदीत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे म्हटले आहे, याकडे चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले होते. एक लाख रुपयांच्या शासकीय खरेदीसाठी ई-निविदा काढणे आवश्यक आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या प्रकरणात २०६ कोटींची खरेदी करण्यात आली, पण निविदाच काढण्यात आली नाही. या खरेदी व्यवहाराची सत्यता जनतेला कळली पाहिजे. यात अनियमितता झाल्याचा संशय येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यात सत्य बाहेर येईल. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा घडवली जाईल अन्यथा कामकाज चालू देणार नाही असा इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How can pankaja munde can get clean chit without any probe says ashok chavan