रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व स्पर्धाना तसेच असोसिएशनची मान्यता असलेल्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. विविध गटांच्या निवड चाचणी स्पर्धाची स्थळे निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापकांची तसेच मुख्य प्रशिक्षकांची निवड या सभेत करण्यात आली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ही सभा घेण्यात आली. रायगड जिल्ह्य़ातील क्रिकेटचा दर्जा अधिक सुधारावा. खेळाडूंना शिस्त लागावी. यासाठी महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या संघातील खेळाडूंना असोसिएशनतर्फे ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे ओळखपत्र प्रत्येक स्पध्रेच्या वेळी असणे अनिवार्य करण्यात यावे. ज्या खेळाडूकडे हे ओळखपत्र नसेल त्याला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त स्पर्धामध्ये खेळण्यास अपात्र ठरविण्यात यावे. एका खेळाडूला एका हंगामात एकाच संघातून खेळण्याची परवानगी देण्यात यावी, असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. खेळाडूंना ओळखपत्रासाठी अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबपर्यंत करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात चांगले पंच तयार व्हावेत यासाठी जिल्हास्तरीय क्रिकेट पंच परीक्षांचे आयोजन करणे. चांगले प्रशिक्षक तयार व्हावेत यासाठी शिबीर आयोजन करण्यात यावे असा निर्णय सभेत घेण्यात आला. या सभेत विविध गटांच्या निवड चाचणी स्पर्धाची ठिकाणे निश्चित करण्यात आली.१४ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा उरण येथे. १६ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी आरसीएफ अलिबाग येथे. १९ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा पनवेल येथे तर खुल्या गटाची निवड चाचणी स्पर्धा भेंडखळ व पेण येथे आयोजित करण्यात येणार आहे. ज्याने रायगड जिल्ह्य़ाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे अशाच खेळाडूंची संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. त्यानुसार १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून नयन कट्टा व अनंत घरत, १६ वर्षांखालील मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून उदय गद्रे व संदीप पाटील, १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून रवींद्र तांडेल, वरिष्ठ संघाचे व्यवस्थापक म्हणून विवेक बहुतुले यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व गटांच्या संघांचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून िशकर दळवी यांची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांना सहकारी बँकेचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला. राजेंद्र कोंडाळकर यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ज्युनियर संघ निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली. शंकर दळवी यांची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली. रायगडची प्रीती शशिकांत पाटील हिची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली. या सर्वाचा अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, सरचिटणीस संजय तावडे, विवेक बहुतुले, अनिल गद्रे, विजय पाटील, भगवान शेट्टी, अनिरुद्ध पाटील, राजेंद्र भावे यांच्यासह रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या संघांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.