अहिल्यानगर: शहरात आज, सोमवारी सकाळी दोन गटात तणावाची घटना घडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला. दरम्यान शहरात विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण होते. बाजारपेठा बंद होत्या. शहरात ठिकठिकाणी गटागटांनी दोन्ही बाजूचे जमाव चर्चा करत थांबून होते. रास्ता रोको, दगडफेक करणाऱ्या २२ जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रानिमित्त शहरात दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले होते. ही दौड शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातून जाणार होती. त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. त्यावरून दौड नियोजन केले होते. ही रांगोळी आक्षेपार्ह असल्याची तक्रार करत माळीवाडा भागात जमाव जमला. या जमावाने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान कोतवाली पोलिसांनी रांगोळी काढणाऱ्या एका जणास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

त्या पाठोपाठ जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. विरुद्ध बाजूचा जमावही तेथे आला. दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आला घोषणाबाजी करू लागला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

लाठीमार झाल्याचा निषेध करण्यासाठी एका गटाचा जमाव कोठला भागात जमा झाला त्याने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलन बराच काळ चालल्याने दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पुन्हा लाठीमार केला. त्यानंतर पळापळ सुरू झाली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपअधीक्षक दिलीप टिपरसे व शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. पोलिसांनी कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड केल्याप्रकरणी २२ जणांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी शहरात लागलेले काही फलक हटवावेत या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले‌ आहे. शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्याने बाजारपेठेतील दुकाने बंद झाली होती. शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

दरम्यान शहरात उद्या, मंगळवारी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची पूर्वनियोजित सभा होत आहे.