अहिल्यानगर : नव्यानेच तयार केलेल्या शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. मयूर संतोष शिनगारे (वय १२) व पार्थ उद्धव काळे (वय ७) अशी दोघा मुलांची नावे आहेत. नेवासा तालुक्यातील गेवराई येथे ही घटना शनिवारी दुपारी घडली.

गेवराई येथील उद्धव काळे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शेततळे बनवले होते व त्यात दोन दिवसांपूर्वी पाणी भरले होते. आई-वडील शेतात मिरच्या तोडण्यात मग्न असतानाच दोन्ही मुले खेळता खेळता शेततळ्याकडे गेली. दोघेही पाण्यात उतरले, मात्र त्यांना पोहता येत नव्हते. बुडू लागल्याने त्यांचा आरडाओरडा जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांच्या कानी पडला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

सुमारे ४० फूट खोलीच्या शेततळ्यात दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोहणाऱ्यांनाही तिथपर्यंत पोहोचता आले नाही. अखेर शेवटी जेसीबीच्या मदतीने तळ्याचा भराव फोडण्यात आला. नेवासा फाटा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने गेवराई गावावर शोककळा पसरली आहे.