रत्नागिरी – दोन गवा रेड्यांच्या लागलेल्या झुंजीमध्ये दोघांचा ही कड्या वरुन पडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी ही घटना घडली. याठिकाणी वन विभागाच्या पथकाने पंचनामा करुन शवविच्छेदन झाल्यावर त्यांना अग्नी देवून नष्ट करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कडे आंबा घाटात असलेल्या कळकदरा येथे रस्त्याच्या बाजूला दोन गवा रेड्यांच्या लागलेल्या झुंजी मध्ये कड्यावरून पडून मृत झाल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने साहित्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी दाभोळे यांनी या रेड्यांचे शवविच्छेदन करून हे गवारेडे झुंजीदरम्यान मृत झाल्याचे सांगितले.

शवविच्छेदनानंतर या मृत दोन गवारेड्यांचे शरीर सर्व अवयवांसहित सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले.