महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार बनवण्याची तयारी करत असताना केंद्रातही समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांची राज्यसभेतील आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे. शिवसेनेचे हे दोन्ही नेते आता राज्यसभेत विरोधी बाकावर बसणार आहेत.
शिवसेनेने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरचे दोर पूर्णपणे तोडले नसले तरी ती आता फक्त औपचारिकता मात्र उरली आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभेतील शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आल्याचे आम्हाला समजले आहे असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
“जुनी एनडीए आणि आताची एनडीए यामध्ये खूप फरक आहे. आज एनडीएचे संयोजक कोण आहेत? आडवाणीजी एनडीएच्या संस्थापकांपैकी एक आहेत पण ते आज सक्रीय नाहीत” असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही निश्चित सरकार स्थापन करु. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.