रत्नागिरी : रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात आणखी तिघेजण जखमी झाले असून मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे भूतपूर्व सरचिटणीस निवृत्त प्रा. प्रताप सावंत देसाई, वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरीतील हे सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या डंपरने गाडीला जोरात धडक दिली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. हा अपघात इतका भयावह होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय निकम यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना सहाय्य केले.

अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई , निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, श्रीराम मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते. यापैकी तिघांचे निधन झाले तर किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ratnagiri three devotees died in car accident near sinnar returning from kumbh mela one seriously injured css