सांगली : पाच ईसावर दहा वर्स झाल्ती. म्हातारी आज-उद्या जाणार हे सर्व्यांना ठाऊकच होतं. निसर्गानं आपलं काम केलं अन म्हातारी गेली. पै- पाहुण्यांना निरोप धाडलं. शेजारीपाजारी जमली होती. आयायाबाया धाय मोकलून निष्प्राण कुडीला कवटाळून रडत होत्या. अन आक्रीत घडलं. देहाला मिठी मारुन आकांत करणाऱ्या महिलांना तिच्या कुडीत दुगदुगी जाणवली. डॉक्टरला बोलावणं धाडलं. डॉक्टर आला. बघितल तर म्हातारी पुन्हा जित्ती झाल्याचं दिसलं. मेल्याली म्हातारी तब्बल ७२ तासाहून अधिक वेळ जगली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साताऱ्यातील इंटरनेट सेवा ७२ तासांनी सुरु

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील श्रीमती गंगुबाई नाना देसाई (वय ११०) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. तीन दिवसांपूर्वी गंगुबाईंच्या मृत्यूचा शोक नातेवाईक करीत असतानाच त्या जिवंत असल्याचे नातेवाइकांना कळाले. तीन दिवसांनंतर पुन्हा त्यांचे निधन झाले. गंगुबाई यांचा तीन दिवसांपूर्वी श्वसन थांबल्यानंतर मृत्यू झाल्याचे ओळखून सर्व कुटुंबीय, नातेवाईक शोकसागरात बुडाले होते. त्याचवेळी त्यांच्यात हालचाली जाणवल्या. त्यामुळे कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. तीन दिवस त्या सर्वांसोबत राहिल्या आणि शनिवारी रात्री गंगुबाई यांचे निधन झाले. दीर्घ आयुष्य जगल्याने व श्वास थांबल्यानंतरही पुन्हा त्यांच्या शरीरात झालेल्या हालचाली या घटनांनी आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व देसाई वस्तीवरील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक नाना देसाई यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli 110 year old woman alive after her death and lived for 3 days everyone surprised css