सांगली: महामार्गावर उभ्या असलेल्या मोटारीवर मोटार आदळल्याने झालेल्या अपघातात गोव्याची महिला जागीच ठार झाली तर मोटारीतील एका महिलेसह दोघेजण जखमी झाले. पंढरपूरला देवदर्शनासाठी गोव्यातून भाविक निघाले असताना अलकूड एम ता.कवठेमहांकाळ येथे नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला.
गोव्याहून काही भाविक पंढरपूरला देवदर्शनासाठी मोटारीतून (जीए ०३ वाय ६१३६) निघाले होते. ही मोटार महामार्गावरील रत्ना पेट्रोलपंपासमोर उभी असताना याच मार्गावरून सोलापूरकडे निघालेली मोटार (टीएस ०७ जेएल ३३३९) आदळली. यामुळे झालेल्या अपघातात गौरी कुडाळकर (वय ६० रा. अरनोडा ता. बार्देश, गोवा) ही महिला जागीच ठार झाली तर शाबाजी राजेंद्र गाड (वय ३० रा. डिचोली) आणि सुरेखा शिरोडकर (वय ६० रा. फटरीवाडा, बार्देश) हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वाहनचालक हार्से भास्कर पोरेड्डी याच्याविरूध्द कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.