सांगली : प्रतीकात्मक नागपूजा करून शुक्रवारी बत्तीस शिराळा येथे उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने परिसरात जीवंत सर्प हाताळणी रोखण्यासाठी वन विभागाची फिरती गस्ती पथके तैनात करण्यात आली होती. जिवंत नागपूजेसाठी एकेकाळी जगविख्यात ठरलेल्या शिराळ्यात सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये प्रतिबंध लागू करून सर्प हाताळण्यास, पूजा करण्यावर बंदी लागू केली. प्रशासनाकडून या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कठोर भूमिका घेतली जात असून नागपंचमी अगोदर जनजागृतीवर भर दिल्याने पारंपरिक जिवंज नागपूजेची प्रथा बंद झाली असून आज प्रतीकात्मक नागपूजा करण्यात आली. सकाळी मानकरी यांच्या घरातून पारंपरिक वाद्यांच्या साथीने अंबाबाई मंदिरापर्यंत मानाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. हेही वाचा : Devendra Fadnavis: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आश्वासन अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी होती. आज पावसानेही उघडीप दिल्याने उत्साह मोठा दिसून आला. दुपारनंतर शहरातली ६५ हून अधिक मंडळांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. ट्रॅक्टरवर प्रतीकात्मक नागप्रतिमांच्या या मिरवणुका पाहण्यासाठी शिराळा पेठेत मोठी गर्दी झाली होती. मिरवणुकीत ध्वनीवर्धकांच्या भींतींचा राजरोस वापर पाहण्यास मिळाला. हेही वाचा : बारसू-नाणार आंदोलकांवरील हिंसक गुन्हे सोडून इतर गुन्हे मागे घेणार – उदय सामंत यात्रे दरम्यान, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नेहमीचा पेठ ते शिराळा मार्ग हा वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला होता. तर परतीसाठी ऐतवडे, वशी मार्ग निश्चित करण्यात आला होता. यामुळे मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यात आली.