सोलापूर : अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात आणि लगतच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रविवारी गुरूपौर्णिमेचा उत्सव मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोट नगरीत लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरासह श्री स्वामी समर्थ समाधी मठाच्या परिसरात दर्शनासाठी दूर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलताना भाविकांचा उत्साह अधिकच संचारला होता. अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे गुरूपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे. त्यादृष्टीने काल शनिवारपासूनच अक्कलकोट नगरी भाविकांनी गजबजू लागली. रविवारी भाविकांची अलोट गर्दी उसळली. अक्कलकोट शहरातील सर्व लहानमोठे रस्ते भाविकांनी गजबजून गेले होते. हेही वाचा: सांगली : विक्रीसाठी आणलेल्या १० तलवारी जप्त, तरुणाला अटक पहाटे मंदिरात श्री स्वामी महाराजांची काकड आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले झाले. पहाटेपासून भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजता आरती होऊन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे आदींनी श्रींना महानैवेद्य अर्पण केला. मंदिराचे मुख्य पुरोहित मंदार पुजारी यांनी धार्मिक उपचार पूर्ण केले. त्यानंतर मंदिर समितीच्या महाप्रसादगृहात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून उत्तम नियोजन करण्यात आले होते. मंदिरात दर्शन सुलभतेने होण्यासाठी मंदिर समितीकडून शिस्त लावण्यात आली होती. पोलीस यंत्रणेनेने भाविकांच्या गर्दीचे नियोजन केले होते. अक्कलकोट शहरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी चांगल्या प्रकारे यंत्रणा राबविली. भाविकांच्या रांगा दूरपर्यंत गेल्या असताना मौलाली चौकात स्थानिक तरूणांनी भाविकांची सेवा केली. हेही वाचा: राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे गुरूपौर्णिमेनिमित्त दाखल झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मंदिर समिती समिती व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या यात्री निवास व यात्री भुवनासह इतर छोटी मोठी हाॕटेल, लाॕजेस भरून गेली होती. अक्कलकोट एसटी बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे त्या परिसरात सध्या पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा त्रास भाविकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हेही वाचा: उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका स्वामींच्या दुर्मीळ पादुका, सूर्यमणींचे दर्शन गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून अक्कलकोट भोसले संस्थानाच्या जुन्या राजवाड्यात श्री स्वामी समर्थ समर्थांच्या दुर्मीळ पादुका आणि सूर्यमणींचे खुले दर्शन घडले. दिवंगत श्रीमंत मालोजीराजे भोसले (दुसरे) यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या पादुका दिल्या होत्या. तसेच श्री स्वामी महाराजांनी स्वतः हाताळलेले सूर्यमणीही भोसले संस्थानाने जतन करून ठेवले आहे.