पुरवठय़ासाठी नातेवाइकांसह डॉक्टरांचे जिल्हा प्रशासनाला साकडे

लातूर : करोनाचा उद्रेक वाढत असतानाच प्राणवायू पुरवठा अपुरा असल्याने करोना रुग्णावर उपचार करणारी रुग्णालयेच अडचणीत आली आहेत. रुग्णांचे प्राण कसे वाचवायचे याची चिंता रुग्णालयांना लागून राहिलेली आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शहराच्या बार्शी रस्त्यावरील आयकॉन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमोद घुगे यांनी रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा अतिशय अपुरा असल्याने चिंता व्यक्त केली. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांनी आपण प्राणवायूचा पुरवठा संपला तर काहीही करू शकणार नाही, असे सांगत हतबलता व्यक्त केली. रात्री-बेरात्री रुग्णालयातून प्राणवायू पुरवठा संपत आल्याचे दूरध्वनी येतात व प्राणवायू सिलिंडर उपलब्ध करणे हीच एक चिंता असल्याचे सांगितले. प्राणवायूचे व्यवस्थापन करणे हेच डॉक्टराचे काम होऊन बसले आहे. त्यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही डॉ. घुगे म्हणाले.

शहरातील विवेकानंद रुग्णालयातील राधेश्याम कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता प्राणवायूचा पुरवठा अतिशय बेताचा असून कसेबसे दिवसभर प्राणवायू पुरेल इतकाच साठा असल्याचे सांगितले. फुलाबाई बनसोडे रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक गानू यांच्याशी संपर्क साधला असता प्राणवायू तोकडा असून कमीत कमी प्राणवायूचा वापर करण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांना प्राणवायूचा पुरवठा संपला तर तुमच्या रुग्णांना अन्यत्र हलवावे लागेल. त्याची तयारी ठेवा, अशी कल्पना देऊन ठेवली असल्याचे सांगितले.

मागणी अधिक, पुरवठा कमी

विजय एजन्सीज या प्राणवायू उत्पादन कंपनीचे विनोद गिल्डा यांच्याशी संपर्क साधला असता हवेतून व द्रवरूपमधून एका तासाला ६० सिलिंडर भरत आहेत व रुग्णालयाची मागणी १०० सिलिंडरची आहे. त्यामुळे अतिशय ओढाताण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राणवायू उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी संपर्क साधला असता प्राणवायूचा तुटवडा भासत आहे, हे सत्य असून सर्व रुग्णालयांना प्राणवायूचा कमीत कमी वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बेल्लारी येथून प्राणवायूचा पुरवठा अपेक्षित आहे. त्याचाच पाठपुरावा शासकीय यंत्रणा करत असल्याचे सांगितले.

प्राणवायूची अडचण दूर होत आहे

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता द्रवरूप प्राणवायूचा एक टँकर लातूरला पोहोचला आहे. एक टँकर हैदराबादहून तर एक टँकर पुण्यावरून निघाला आहे. प्राणवायू पुरवठय़ाची अडचण दूर होत असून परिस्थितीच चिंताजनक असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन सर्वतोपरी सर्व यंत्रणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. प्राणवायूचा पुरवठा पुरेसा होईल त्यामुळे रुग्णालयांनी अथवा रुग्णांच्या नातेवाइकांनी चिंतित न होण्याचे आवाहन त्यांनी केले.

२४ तासांत २६ जणांचा मृत्यू

२० एप्रिल रोजी दिवसभरात नव्याने १ हजार ४७७ करोनाबाधितांची भर पडली व दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य प्रशासनाने जाहीर केले. गृह विलगीकरण व विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांची संख्या १६ हजार २०० वर पोहोचली आहे. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्रात लातूर जिल्ह्य़ाचा क्रमांक सातवा आहे.