बारामतीच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे स्पष्ट दोन गट पडलेले आहेत.  तर पवार कुटुंबातही अजित पवाराच्या बंडामुळे दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे. पवार कुटुंबीयातील काहीजण अजित पवारांच्या मागे तर काही जण शरद पवारांच्या मागे उभे आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबर असल्याची जाहीर घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार कुटुंबात एकटे पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

रोहित पवार म्हणाले, “बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला कळलं की युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता. आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट. आपली संस्कृती हीच आहे की आपल्या वडिलधाऱ्यांबरोबर राहणं आपली जबाबदारी आहे. लहानपणापासूनच आपल्याला हे शिकवलेलं असतं. आपले वडील आणि आजोबांना वयस्कर झाल्यावर त्यांना बाहेर काढायचं हे आपल्या संस्कृतीत शिकवेललं नाही. युगेंद्रही त्याच विचाराने राहतोय हे पाहिल्यानंतर या नातवालासुद्धा (रोहित पवारांना) आवडलेलंच आहे. संस्कृती जपणं आपली जबाबदारी आहे. स्वतःचे हित जपण्यासाठी तुम्ही आपल्या काकांना, नेत्यांना सोडून जातायत ही आपली संस्कृती नाही.

हेही वाचा >> अजित पवारांच्या कुटुंबातीलच व्यक्ती आता मैदानात; सख्खा पुतण्या म्हणतो “शरद पवार साहेब म्हणतील तसं..”

अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?

अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “कुटुंब म्हणून अजित दादांना आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो. शरद पवारांनी अजित पवारांना मोठी ताकद दिली होती. अनेक मोठ- मोठी पदे अजित दादांना मिळाली. व्यक्तिगत जीवनातही त्यांची झालेली प्रगती पाहिली. परंतु, प्रगती झाल्यानंतर साहेबांना सोडून जाणं, साहेबांनी बांधलेल्या घरातून साहेबांना बाहेर काढणं हा निर्णय त्यांनी घेतला तो कुटुंबाला नाही आवडला.”

“अजित पवारांचा निर्णय जर कुटुंबालाच नसेल आवडला तर सामान्य लोकांना कसा आवडेल? परंतु, अजित दादांची जागा कोणी घेत नाही. मी तर लांबचा पुतण्या आहे. युगेंद्रतरी सख्खा पुतण्या आहे. युगेंद्रने साहेबांची भूमिका घेतली. पवारांची भूमिका युगेंद्रने सोडली नाही, त्यामुळे कुटुंब अजित पवारांना एकटं पाडत नाहीय तर, कुटुंबाला एकटं पाडून ते सत्तेत गेले आहेत”, अशी टीका रोहित पवारांनी केली.