जालना – जालना शहरातील भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रथम त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याकरिता चालू आर्थिक वर्षात (२०२५-२०२६) २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. एक कुत्र्याला पकडून त्याच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रतिश्वान एक हजार रुपये असा दर ठरविण्यात आला होता. निविदा अंतिम करुन कंत्राट निश्चित केले असले तरी गेल्या ऑगस्टपासून ३०० कुत्र्यांचेच निर्बिजीकरण झालेले आहे. यापूर्वीही अशी निविदा निश्चित करण्यात आली होती परंतु संबंधित कंत्राटदाराने महानगरपालिकेस पूर्वकल्पना न देता काम बंद केले होते.नंतर नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली.
जालना शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढल्याने रहिवाश्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. मागील एप्रिलपासून आतापर्यंत शहरात किती नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला याचा निश्चित आकडा महानगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले की, शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी निविदा काढून गेल्या मे महिन्यात कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे. या कंत्राटदाराने गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरु केले आहे. तेव्हापासून जवळ्यास ३०० कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.
भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करणे आणि त्यांना पुन्हा जेथून पकडले तेथे नेऊन सोडण्यासाठी प्रति कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये देण्याचा करार आहे. त्यामुळे ऑगस्टपासून आतापर्यंत तीन लाख रुपयांचे काम झालेले असून कंत्राटदारास अद्याप कोणतेही देयक अदा करण्यात आलेले नाही. पकडलेल्या कुत्र्यांना केंद्रावर नेऊन निर्बिजीकरण शस्त्रक्रियेनंतर तेथे तीन दिवस ठेवावे लागते. सध्या असे एकच केंद्र शहरात असून आणखी एक केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
बाहेरच्या शहरांतून जालना शहरात कुत्री आणून सोडली सोडण्यात येत आहेत का? या प्रश्नावर सहाय्यक आयुक्त चव्हाण म्हणाल्या, अशा तक्रारी आमच्याही कानावर आलेल्या आहेत. बाहेरच्या शहरातून आलेले कुत्र्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्याही निदर्शनास आले होते, अशी माहिती आहे.
