अलिबाग – भारत आणि इस्‍त्रायल यांच्‍यातील संबंध अधिक दृढ व्‍हावेत यासाठी महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाने महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. राज्‍यातील ज्‍युईश प्रार्थनास्‍थळे आणि वारसा स्‍थळांना पर्यटन स्‍थळांचा दर्जा देण्‍यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्‍त्रायलचे मुंबईतील वाणिज्‍य दूत कोबी शोशानी यांनी आज अलिबागला भेट दिली.

कोबी शोशानी यांनी आपल्‍या अलिबाग दौरयात रेवदंडा आणि अलिबाग येथे ज्‍युईश प्रार्थनास्‍थळांना (सिनेगॉग) भेट दिली. स्‍थानिक ज्‍युईश बांधवांशी चर्चा केली. या प्रार्थनास्‍थळांचे जतन करा असे आवाहन त्‍यांनी केले. भारत आणि इस्त्रायलमधील हे सांस्कृतीक नाते अधिक वृद्धींगत करण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयासोबत, इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने “द ज्यू रूट” चे उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे., ज्यामध्ये जवळपास १२ स्थळे आहेत आणि जगभरातील पर्यटकांना भारतातील ज्यूंच्या वारसास्‍थळांना भेट देण्यासाठी आमंत्रित केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भारत इस्त्रायल मधील सांस्कृतीक वारसा अधिक वृद्धींगत करण्याचा उभय देशांचा प्रयत्न असून त्यांच अंतर्गत आज मी अलिबाग मधील १८४० मध्ये बांधलेल्या मागेन आबोध आणि रेवदंडा येथील बेथ एल सिनेगॉग या ज्यूईश प्रार्थना स्थळांना भेट देण्यासाठी आलो असल्याचे त्‍यांनी सांगीतले. यावेळी बेंजामीन वासकर, केरेन चौलकर, एलीस वासकर, बेनी चौलकर शोफेत आवासकर, अब्राहम आवासकर, मोजस कासुकर, जेकब वासकर आदि उपस्थित होते.

अलिबाग आणि रेवदंडा येथील ज्‍युईश प्रार्थनास्‍थळांबाहेर फलक लावण्‍यात आले आहेत. त्‍याचे अनावरण आज कोबी शोशानी यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले. या फलकांवर एक क्‍यू आर कोड देण्‍यात आला आहे. तो स्‍कॅन केला तर त्‍या सिनेगॉगची (प्रार्थनास्‍थळ ) माहिती उपलब्‍ध होते अशी माहिती अलिबागचे शोफेत आवासकर यांनी दिली.